बियाणे व पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित/संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान ०.२० हे ते कमाल १ हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत ७/१२ उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तुर, मुग, उडीद १० वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास ५० रू. किलो प्रमाणे अनुदान असुन १० वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास २५ रू. किलो प्रमाणे अनुदान देय असते. तुर, मुग, उडीद, बाजरी, मका या पिकांच्या अनुदानावरील बियाण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे ५ वर्षाच्या आतील वाण व भुईमूग बियाणे ५ वर्षाच्या आतील वाण १०० टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. या साठी महाडीबीटी पोर्टलवर आजपासुन गुरूवारपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दि.२९रोजी संदेश जातील व यादी प्रसिद्ध होईल. अनुदानावरील बियाण्यासाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःचे आधार कार्ड घेवून आपल्या तालुक्यातील शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांच्या वितरकामार्फत शुक्रवारपासुन बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या गुरूवारी प्रसिद्ध केल्या जातील.
त्याचप्रमाणे
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पिक
प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार असुन पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक
कंपनी,
कृषि
क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. व्दारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा
३१ मार्च २०२४ पुर्वी नोंदणीकृत असावा. पिक प्रात्यक्षिकासाठी MahaDBT पोर्टलव्दारे
नोंदणीकृत शेतकरी गट/कंपनी/संस्था निवड ही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर निवड
करण्यात येणार आहे. गटातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त २५
शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करावयाची आहे तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील
एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे. शेतकरी गट/कंपनी/संस्था यामधील शेतकऱ्यांना
पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील
जास्तीत जास्त शेतकरी/शेतकरी गट/कंपनी आणि संस्था यांनी www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.२९पर्यंत अर्ज करावेत व अधिक
माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment