शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरून- संजय काटकर
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- राज्यशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या १०२७ अधिसूचित सेवा ह्या ऑनलाईन दिल्या जातात. ह्या सर्व सेवा ह्या वेगवेगळ्या विभागांच्या व वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन दिल्या जातात. ह्या सर्व सेवा ह्या १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,अशी माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी आज येथे दिली.
महा-आयटीमार्फत शासनाच्या
सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्धतेच्या अनुषंगाने स्थानिक आपले सेवा केंद्र चालकांच्या
भेटी घेणे व स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेणे यासाठी आज श्री. काटकर जिल्हाधिकारी
कार्यालयात आले होते. जिल्ह्यातील आपले सेवा केंद्र चालकांची बैठक जिल्हा नियोजन
सभागृहात घेऊन श्री. काटकर यांनी मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी संभाजी
अडकुणे, प्रकल्प संचालक शरद दिवेकर हे ही यावेळी उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की,
सेवा अधिनियमाअंतर्गत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ह्या सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर
आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु असून त्यात
१३८ सेवा ह्या ३१ मे पर्यंत एकत्रीत केल्या जाणार असून त्यापैकी ९२ सेवा एकत्रित
केल्या आहेत. तर ३०६ सेवा ह्या ऑफलाईन दिल्या जातात त्याही ऑनलाईन करण्यासाठ
प्रयत्न होत आहेत. अशा प्रकारे सर्व १०२७ सेवा १५ ऑगस्ट पर्यंत नागरिकांना देता
येतील असे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. या सेवा पुरवितांना सेवा केंद्र
चालकांच्या अडचणी जाणून घेणे, येथे अधिक
काम असते तेथे पाच लॉग ईन देणे, भूकेंद्रीत
सेवा देणे, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात १०९४ सेवा केंद्र असून
या सेवा केंद्रांवर सेवांचे दर प्रदर्शित करणे, क्यू आर कोड वर तक्रार दाखल करता
येणे, भुस्थिर सेवा देणे इ. सुधारणा करण्यात येत असल्याचेही श्री.काटकर यांनी
सांगितले. या सेवांची माहिती लोकांना मिळावी म्हणून व्हॉटसअप वरुन चॅट्बोट सुविधा
नजिकच्या काळात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
०००००



Comments
Post a Comment