जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार ००००० बिडकीन येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विकासासाठी पुढाकार
छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि.यांच्यात आज सामंजस्य करार झाला. टोयटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक
सुदीप दळवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी
उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध क्षेत्रात सहकार्य करुन
जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ असा विश्वास यावेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त
करण्यात आला.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील
सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) जयश्री
चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाटकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण
प्रशिक्षण संस्था डॉ. आर.डी. कांबळे, उपजिल्हाधिकारी विजय राऊत, संगिता राठोड, टोयटा
किर्लोस्कर कंपनीच्यावतीने वरिष्ठ उपाध्यक्ष तथा संचालक सुदीप दळवी, जनरल
मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी.एस. तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी
उपस्थित होते.
शाश्वत सामाजिक प्रभाव आणि सर्वसमावेशक
समुदाय विकासाच्या दिशेने कटिबद्धता राखत टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि.ने महाराष्ट्र
शासनासोबत आज सामंजस्य करार केला. या करारांतर्गत बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय
प्राथमिक शाळेचा सर्वांगीण पायाभूत विकास करण्यात येणार आहे.
उत्तम शैक्षणिक सुविधांची उपलब्धता- जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी टोयोटा
किर्लोस्करच्या या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रमाचा शिक्षण विकासासाठी विनियोग
होत असल्याबद्दल अभिनंदन केले. बिडकीन येथील शाळेत गोरगरीब वर्गातील विद्यार्थी
शिक्षण घेतात. तेथे ह्या सुविधा निर्माण होऊन त्यांना उत्तम सुविधा मिळतील ही अधिक
आनंदाची बाब आहे. दर्जेदार शिक्षण व संस्कारीत विद्यार्थी घडविण्यावर प्रशासनाचा
भर आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जोडीला प्रशासन आहे. या प्रयत्नात
टोयोटा किर्लोस्कर सारख्या संस्थेचे योगदान नक्कीच मोलाचे ठरेल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
ग्रामिण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधांची उपलब्धता- जि.प.
सीईओ अंकीत
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचे
स्वागत आहे. या उपक्रमातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा
उपलब्ध होतील. शालेय इमारत ही शैक्षणिक उपयोजनासाठी असावी या पद्धतीने तिची रचना
असावी, तसेच ही इमारत पर्यावरणपूरक असावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समुदाय विकासासाठी शिक्षण- सुदीप दळवी
टोयोटा किर्लोस्करचे सुदीप दळवी यांनी
सांगितले की, ही शालेय विकास योजना टोयोटाच्या आगामी औद्योगिक गुंतवणुकीस पूरक असून
महाराष्ट्रात नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या निर्णयासोबत रोजगारनिर्मितीस चालना
देणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सामाजिक उत्तरदायित्व निधीबाबतचे धोरण शिक्षणावर
आधारित असून ‘समुदाय विकासासाठी शिक्षण’ या तत्वावर आधारित आहे. 'बालक ते समुदाय विकास'
या दृष्टिकोनातून, लहान वयातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे केवळ विद्यार्थ्यांसाठीच
नव्हे तर संपूर्ण कुटुंबांसाठी आणि समाजासाठी परिवर्तन घडवून आणण्याचे माध्यम ठरते.
त्यासाठी ‘समुदाय विकास’ धोरणाने टोयोटाचे
सामाजिक उपक्रम ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये राबवले जात आहेत.
असा आहे प्रकल्प
बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत
सध्या मराठी पहिले ते चवथी व उर्दू पहिली
ते १० वी पर्यंत वर्ग आहेत. एकूण ८०० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. टोयोटा किर्लोस्कर मार्फत उभारल्या जाणाऱ्या नव्या
इमारतीत १२०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील इतकी क्षमता निर्माण करण्यात येईल. याशिवाय
अन्य शैक्षणिक सुविधांची निर्मिती करण्यात
येईल. या करारानुसार ३० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष,
वाचनालय, खेळाची खोली, स्वयंपाकघर, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदींचा समावेश
आहे. याशिवाय सुरक्षितता, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित मूलभूत शिक्षणाचे साहित्यही
दिले जाणार आहे. २०२५ ते २०२८ दरम्यान तीन टप्प्यांत ही कामे पूर्ण होणार आहेत.
०००००




Comments
Post a Comment