नक्शा प्रकल्पः कन्नड शहरातील १०,३३६ मालमत्तांचे नकाशे तयार; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका) – ‘नक्शा’
हा मालमत्तांचे डिजीटल उतारे देण्यासाठी राबविण्यात येणारा पथदर्शी प्रकल्प कन्नड शहरात
(नगरपालिका हद्द) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे सात टप्पे असून सहा टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे.
त्यात १० हजार ३३६ मालमत्तांचे नकाशे तयार असून आता पुढील टप्प्यांच्या कामाला सुरुवात
करण्यात येईल, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. जिल्हा अधीक्षक
भुमि अभिलेख डॉ. विजय वीर, न.प. प्रशासन सहा. आयुक्त ऋषिकेश भालेराव, सहा. नगर रचनाकार
हरीष गुडे, नगर रचना विभागाचे कौस्तुभ भावे आदी उपस्थित होते.
कन्नड शहरात राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पात
प्रारंभीच्या टप्प्यात सर्व कामे पूर्ण झाली असून त्यात प्रामुख्याने तपासणी, मोजणी
आदी कामे होती. त्यानुसार ड्रोनद्वारे शहराचे प्रतिमाकरणही झाले आहे. त्यानुसार मालमत्तांचे
डीजीटल नकाशे तयार झाले आहेत. १० हजार ३३६ नकाशे असून या नकाशांचे प्रतिमा प्रमाणीकरणाचे
काम आता पुढील टप्प्यात सुरु होईल, अशी माहिती डॉ. विजय वीर यांनी दिली. ही सर्व कामे
वेळेत आणि समन्वयाने करावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
०००००

Comments
Post a Comment