अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरू
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)-
राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी
(अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी
विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून
अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी
नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.
लक्षित गटातील युवक व युवतींनी या
सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक
अक्षय लंबे यांनी केले आहे. या प्रशिक्षण योजनांमधून प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगार
सुरू करण्यास तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या योजनेअंतर्गत अमृत उद्योग कौशल्यवर्धन,
अमृत सूर्य मित्र, सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी
पार्लर), अमृत बेकरी तसेच अमृत आयात–निर्यात प्रशिक्षण असे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात
येणार असून, हे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत आहेत.
अमृत संस्था ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या
प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा
लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट
आहे. यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया,
बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित,
नायडू, भूमिहार, हिंदू नेपाळी, कानबी, एलमार आदी जातींचा समावेश आहे. या जातींमधील
वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नागरिक अमृत संस्थेच्या विविध योजनांचा
लाभ घेऊ शकतात.
इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता
अमृत कार्यालयाशी संपर्क साधून या प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात
आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यालय पत्ता :
विभागीय व जिल्हा कार्यालय, अमृत,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर–4, सिडको,
हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर – 431009
00000
Comments
Post a Comment