महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ: क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

 








 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- कामकाजातील तणाव घालविण्यासाठी क्रीडा व कलागुणांची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्पर्धांमधील आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.

विभागीय क्रीडा संकूल येथे आज महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अपर आयुक्त रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगिता राठोड, संगिता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, संतोष गोरड, अरुण जऱ्हाड, नीलम बाफना तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आपल्या दैनंदिन जगण्यात  खिलाडुवृत्तीने जगायचे असते, त्या खिलाडुवृत्तीची जोपासना अशा स्पर्धांमुळे होते. त्यामुळे वातावरण सकारात्मक होऊन निकोप स्पर्धा निर्माण होते. क्रीडा व सांस्कृतिक गुणांची जोपासना ही आयुष्यात आवश्यक असते,असेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, आपल्यातला गुणांचा विकास करण्यासाठी खेळा. छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळायला हवे या जिद्दीने खेळा. उत्कृष्ट सादरीकरणाचा ध्यास घ्या. तणावमुक्त जीवन जगायचे असेल तर क्रीडांगणावर सराव करुन , खेळून घाम गाळावा लागतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. या स्पर्धांमधील विजेते खेळाडू व संघ हे विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी पाठविले जातील. विभागीय क्रीडा स्पर्धा ह्या परभणि येथे  दि.३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा