ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला गॅस सिलींडर हे घरपोच डिलीव्हरीद्वारेच पोहोचवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
गॅस पुरवठ्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या
अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. लोकांना सिलींडर
मिळविण्यासाठी हाल सोसावे लागत असल्याने जिल्हाधिकारी स्वामी यांनी गॅस पुरवठादार
संस्थांची बैठक बोलावली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस उत्पादक कंपन्यांचे
प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चौहान तसेच रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे तसेच
जिल्ह्यातील अन्य गॅस वितरक उपस्थित होते. जिल्ह्यात गॅसचे बुकींग वाढले आहे.
युद्धाच्या पार्श्वभुमिवर हे बुकींग वाढले असून दिलेल्या मुदतीत लोकांना सिलींडर
घरपोच दिले जात आहे. मार्च, एप्रिल महिन्यात असणाऱ्या सरासरी पुरवठ्या इतकीच मागणी
होत असल्याचे कंपनीचे प्रतिनिधी यांनी
निदर्शनास आणले.
गॅसचे
बुकींग ऑनलाईनच होत आहे. मात्र अनेक लोक सिलींडर संपल्यावर थेट सिलींडर घेऊनच एजन्सीवर
गर्दी करत आहेत,असे एजन्सीधारकांतर्फे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी
स्वामी यांनी निर्देश दिले की, कोणताही ग्राहक सिलींडर घेऊन एजन्सीवर येता कामा
नये. ग्राहकाने बुकींग केल्यानंतर त्याला घरपोच डीलीव्हरीद्वारेच सिलींडर
पोहोचविणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत नवीन गॅस जोडणी हे काम बंद आहे. तसेच काही
ग्राहकांची ई केवायसी बाकी आहे. ते काम ग्राहक ऑनलाईन करु शकतात. जिल्हाधिकारी
पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत प्रशासनाचा एक कर्मचारी गॅस एजन्सीवर नियंत्रणासाठी
नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २४ तासात वितरण सुरळीत करावे, अन्यथा
कायदेशीर कारवाई करावी लागेल असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी बजावले.
गॅस एजन्सीधारकांनी
सांगितले की, काही ठिकाणी डिलीव्हरी वाहनाला पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. त्याबाबत
जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना तातडीने निर्देशीत केले. गॅस सिलींडर ग्राहकापर्यंत
नेणाऱ्या वाहनांना पोलीस पेट्रोलिंग देणे आवश्यक करावे,असे त्यांनी सांगितले.
०००००



Comments
Post a Comment