जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांत सुधारणा; जिल्हा व राज्य समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश
छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरण
बदल मंत्रालयाने जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन (सुधारणा) नियम, २०२६ अधिसूचित केले
असून राज्य व जिल्हास्तरीय जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन देखरेख समित्यांमध्ये आता
आयुष विभागाच्या अधिकृत प्रतिनिधींचा समावेश करणे अनिवार्य करण्यात आले आहे,असे जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.
‘आयुष’मध्ये आयुर्वेद, योग, युनानी,
सिद्ध आणि होमिओपॅथी या शाखांचा समावेश आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सल्लागार
डॉ. ए. रघु यांच्या पत्राच्या संदर्भाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालक (तांत्रिक)
डॉ. सुनीता गोरेईन यांनी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या सुधारणेचा मुख्य उद्देश पारंपरिक
औषधोपचार पद्धतींतील सर्व आयुष रुग्णालये, महाविद्यालये तसेच खासगी दवाखान्यांमधून
निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक शास्त्रोक्त, काटेकोर आणि
सुस्थितीत करणे हा आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश झाल्यामुळे
आयुष डॉक्टर व संस्थांच्या अडचणी आणि व्यवहारिक प्रश्न प्रशासनापुढे प्रभावीपणे मांडले
जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व आयुष शासकीय व निमशासकीय रुग्णालये, खासगी
क्लिनिक्स, औषध निर्माण उद्योग तसेच आयुष महाविद्यालयांनी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या
नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पारंपरिक चिकित्सा पद्धतींमध्ये
वापरल्या जाणाऱ्या आणि निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्याचे नियमांनुसार वर्गीकरण
व विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या नव्या सुधारणांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्व आयुष
संस्था आणि महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रचार-प्रसार करावा, जेणेकरून डॉक्टर आणि
कर्मचारी वर्गामध्ये जागरूकता निर्माण होईल.
“आता केवळ मुख्य आरोग्य विभागच नव्हे,
तर आयुष विभागही जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व आयुष डॉक्टर आणि संस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या
समन्वयाने या नियमांचे पालन करावे,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोकर आणि जिल्हा
आयुष अधिकारी डॉ. शेख शफीक यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment