'पराक्रम दिना'निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन 1 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रवेशिका स्वीकारल्या जाणार; विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,
दि. 31 (जिमाका)
- महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त
संस्थेच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या
वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस
राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त 1 ते 15 ऑगस्ट
2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले असून राज्यातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन
'अमृत' संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि
राष्ट्रनिष्ठेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत
आहे. स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा विविध स्तरांवर निबंध व
वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन व
खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.
निंबंध स्पर्धा
निबंधाची शब्दमर्यादा जास्तीत जास्त 1000 शब्द असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत
टंकलिखित करून पीडीएफ स्वरूपात अपलोड करावा. निबंधासाठी 'अमृत पराक्रम दिन'च्या
संकेतस्थळावरील संदर्भ, पुस्तके व माहिती पुस्तिकेचा आधार घ्यावा. परीक्षकांचा
निर्णय अंतिम राहील.
वकृत्व स्पर्धा
स्पर्धकांनी स्वतःचे जास्तीत जास्त सात मिनिटांचे मूळ भाषण व्हिडिओ
स्वरूपात सादर करावे. व्हिडिओमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चित्रे,
व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स वापरता येणार नाहीत. व्हिडिओ स्पष्ट आवाजाचा आणि
उत्तम गुणवत्तेचा असावा.
रिल्स स्पर्धा
महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी आयोजित या स्पर्धेत 2 ते 3 मिनिटांची रिल्स
किंवा शॉर्ट्स तयार करावयाची असून विषयानुरूप स्थळ, उत्तम ध्वनी व चित्रगुणवत्ता
असणे आवश्यक आहे. रिल्स स्वतःच्या आवाजात व स्वतःवर चित्रित केलेली असावी.
विषयानुरूप आवश्यक त्या इमेजेस, ध्वनी किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)चा मर्यादित
वापर करता येईल.
स्पर्धांसाठी पुढील विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर सहभाग नोंदविता येणार
आहे –
- १८
व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे
- अपराजित
योद्धा थोरले बाजीराव पेशवे
- थोरल्या
बाजीरावांचे संघटन कौशल्य
- थोरल्या
बाजीरावांची युद्धनीती
- थोरल्या
बाजीरावांची स्वामीनिष्ठा
- थोरल्या
बाजीरावांची दिल्ली मोहीम
- बुंदेलखंड
व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे
- थोरल्या
बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय
स्पर्धांचे स्वरूप, विषय, बक्षिसे, नियमावली, संदर्भग्रंथांची यादी तसेच
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील ई-पुस्तक 'पराक्रम दिन'च्या अधिकृत
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्ट
ते 15 ऑगस्ट 2026 असा आहे.
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या उपक्रमात
उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन 'अमृत' संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय
जोशी यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment