लोकसंवाद’मधून छावणी येथील गणेशभक्तांच्या दारी डाक विभागाच्या योजना
डाक विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाचा संयुक्त उपक्रम; गणेशभक्तांशी साधला थेट संवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. 21 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत भारतीय डाक विभाग व जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने छावणी येथील छावणी गणेश मंडळात ‘नाईट कॅम्प’ आयोजित करण्यात आला. यावेळी गणेशभक्तांना डाक विभागाच्या विविध बचत, विमा व गुंतवणूक योजनांची माहिती देण्यात आली.
राज्य शासनामार्फत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने दि. १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून शासकीय योजना व सेवांची माहिती पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
छावणी गणेश मंडळात आयोजित कॅम्पमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते (POSB), आवर्ती ठेव (RD), मुदत ठेव (TD), सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी डाक विभागाचे अधिकारी, पोस्टमन कर्मचारी, छावणी गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गणेशभक्त उपस्थित होते.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण यांसह विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

Comments
Post a Comment