कृषी घटकांसाठी अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि. २४ (जिमाका)-अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ तसेच अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ या योजनांतर्गत सिंचन सुविधा व विविध कृषी घटकांसाठी शासकीय अनुदान देण्यात येते. पात्र शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.
अनुदानाचे स्वरुप
योजनेंतर्गत प्रति लाभार्थी नवीन सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये, वीज जोडणी आकारासाठी २० हजार रुपये, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी दोन लाख रुपये, ठिबक सिंचन संचासाठी जास्तीत जास्त ९७ हजार रुपये, तुषार सिंचन संचासाठी जास्तीत जास्त ४७ हजार रुपये आणि १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या विद्युत पंप संचासाठी ४० हजार रुपये अनुदान देय आहे.
तसेच परसबागेसाठी पाच हजार रुपये, पीव्हीसी पाईपसाठी ५० हजार रुपये, सोलर पंपासाठी एचडीपीई/पीव्हीसी पाईपकरिता ५० हजार रुपये तसेच बैलचलित अथवा ट्रॅक्टरचलित कृषि अवजारांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देय आहे.
पात्रता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध प्रवर्गातील, तर बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे.लाभार्थ्याच्या नावावर शेतजमीन असणे तसेच त्याबाबतचा ७/१२ व ८-अ उतारा आवश्यक आहे. नवीन विहिरीच्या लाभासाठी किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर, तर अन्य घटकांच्या लाभासाठी किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे तसेच ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे. दिव्यांग आणि दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेले लाभार्थी तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत वनपट्टाधारकांना निवडीत प्राधान्य देण्यात येईल.
महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावा
इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासाठी लाभार्थ्याचा ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’ असणे अनिवार्य आहे. अर्जदारांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come First Serve) या पद्धतीने करण्यात येणार असून, जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीतील कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी अथवा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
०००००
Comments
Post a Comment