सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाचे विविध उपक्रम


छत्रपती संभाजीनगर, दि. २५ (जिमाका) : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सामाजिक वनीकरण विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिल्ह्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत वृक्षारोपण, वृक्षदिंडी, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छ भारत अभियान तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. १७ सप्टेंबर रोजी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नडच्या वतीने शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी येथे प्राचार्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्याच दिवशी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सिल्लोडच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माध्यमिक विद्यालय, देवळगाव बाजार तसेच रणेश्वर विद्यालय, हट्टी येथे वृक्षारोपण करण्यात आले. प्लास्टिकमुक्ती व स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करून शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.

दि. २२ सप्टेंबर रोजी पीएम श्री जिल्हा परिषद शाळा, गणोरी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण)-फुलंब्रीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘सेवा संकल्प’ कार्यक्रम घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन तसेच राष्ट्रीय संपत्तीची जपणूक करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

दि. २३ सप्टेंबर रोजी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सोयगावच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, सोयगाव येथे वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती व स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. शाळा परिसराची स्वच्छताही करण्यात आली. त्याच दिवशी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गंगापूरच्या वतीने पर्यावरणीय संतुलन राखणे आणि हरित क्षेत्राचा विस्तार करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

दि. २४ सप्टेंबर रोजी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वैजापूरच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, वैजापूर येथे वृक्षारोपणासह प्लास्टिकमुक्ती व स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली.

‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्तीबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक तथा प्रभारी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग एस. बी. फुले यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा