सेवा संकल्प अभियानांतर्गत टोमॅटो पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथे टोमॅटो पिकावरील चुरडा व मुरडा रोगाचे व्यवस्थापन, दुष्काळी परिस्थितीत पिकांची निगा, उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामपंचायत माळी वडगाव येथे दि. २८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, पंचायत समिती गंगापूर, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, कृषी विज्ञान केंद्राच्या संजुला भावर तसेच तालुका कृषी अधिकारी जायभाय यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
टोमॅटो पिकावरील रोग व किडींचे वेळेत व्यवस्थापन करण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पिकांची योग्य निगा राखावी. तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Comments
Post a Comment