वेरुळ येथील भुयारी मार्गाच्या कामामुळे जड वाहतुकीस प्रतिबंध
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ येथील विकास आराखड्यांतर्गत मंदिरासमोरील राज्य मार्ग क्र. २१६ (खुलताबाद जंक्शन ते वेरुळ) येथे भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील सर्व जड वाहतूक दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते दि. २९ मार्च २०२७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी दिले आहेत.
भुयारी मार्गाचे काम राज्य मार्ग क्र. २१६ ला छेदून होणार असल्याने बांधकाम कालावधीत उत्खनन व संरचनात्मक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग:
कन्नड ते वेरुळ-खुलताबाद-दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहने कसाबखेडा फाटा-वरझडी-माळीवाडा-शरणापूर फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
फुलंब्री-खुलताबाद-वेरुळमार्गे कन्नड व चाळीसगावकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर-शरणापूर फाटा-माळीवाडा-वरझडी-कसाबखेडा फाटा-वेरुळमार्गे कन्नड व चाळीसगावकडे जातील.
कन्नड व चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने कन्नड-वेरुळ-कसाबखेडा फाटा-वरझडी-माळीवाडा-शरणापूर फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
श्री घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित वाहनांनी निश्चित केलेल्या मार्गांचा वापर करावा.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. नागरिक व वाहनधारकांनी वाहतूक बदलाची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment