सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षण ;उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेचे मोफत पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६७ आयोजित करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे उपस्थित राहावे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १८ ऑक्टोबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरील एसएसबी-६७ कोर्सचे प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे प्रिंट करून पूर्ण भरलेल्या स्वरूपात सोबत आणावीत.

प्रशिक्षणासाठी पात्रता

उमेदवाराने पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे : CDSE-UPSC अथवा NDA-UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र असणे; एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे; टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे; किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असणे. संबंधित पात्रतेचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होण्याच्या या प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा