पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ००००० ‘कर्जमुक्ती’चा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण तातडीने पूर्ण करा - जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन
चौथी यादी प्रसिद्ध, जिल्ह्यातील ४१ हजार १७०
शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ (जिमाका)- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ योजनेत कर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची चौथी यादी दि.१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण चारही याद्या मिळून जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ३७१ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी १ लाख ५ हजार २०१ शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप ४१ हजार १७० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यांनी ते त्वरीत करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत १९ हजार १४० पात्र शेतकऱ्यांची नावे आहेत. दि. १२ रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीतील कर्जखात्यांसह जिल्ह्यात एकूण १ लाख ४६ हजार ३७१ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी १ लाख ५ हजार २०१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. अद्याप ४१ हजार १७० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासन स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.
आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २९ हजार ८२२ कर्जखात्यांमध्ये १४२.९७ कोटी रुपये, तर इतर बँकांच्या ६३ हजार ४४६ कर्जखात्यांमध्ये ५५५.९६ कोटी रुपये, अशी एकूण ९३ हजार २६८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ६९८.९३ कोटी रुपये जमा होऊन त्यांची कर्जखाती निरंक थकबाकी करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे.
आधार प्रमाणिकरण तातडीने करणे आवश्यक
पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या याद्या सर्व तालुक्यांतील गावपातळीवरील संबंधित बँक शाखा, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात (ASSK) जाऊन आधार प्रमाणिकरण तातडीने पूर्ण करावे. आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक व बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केली आहे.
आधार प्रमाणिकरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीत आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच आधार प्रमाणिकरणासाठी जाताना अँग्रीस्टॅक क्रमांक, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत ठेवावे.
अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर तसेच उपनिबंधक व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment