दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

 


छत्रपती संभाजीनगर, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण करावे. प्रत्येक गावात १०० जलतारा कामांचे नियोजन करून त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. गावनिहाय आवश्यक जलसंधारण कामांची निश्चिती करून त्यांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली मृद व वजलसंधारण विभागाच्या कामांचा तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश शिंगारे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके, प्र. उपवनसंरक्षक सुवर्णा माने  अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी  तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की, दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करता जलसंधारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध जलस्रोत आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोणत्या गावात कोणत्या योजनेअंतर्गत कामे करता येतील, याचे नियोजन करावे. यासाठी संबंधित विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करावे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा ३ हजार ३१४ शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३०२ गावांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यापैकी २३७ गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा आतापर्यंत ३ हजार ३१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. उर्वरित कामांना गती देऊन पाझर तलावांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जलसंधारण विभागाकडील उपलब्ध यंत्रसामग्रीचा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपयोग करून जलसंधारणाची कामे राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. स्वयंसेवी संस्थांच्या जलसंधारणविषयक उपक्रमांना प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जलतारा कामांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने तयार करावेत. प्रशासकीय मान्यतेची स्थिती तपासून संबंधित विभागांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याच्या शक्यता तपासाव्यात. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत गावपातळीवर लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि भूजलपातळी वाढविण्याच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.



Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा