सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' २१ ऑक्टोबर ;महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप्स व नवसंशोधकांना सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्था (CSMSS), कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सत्रात स्पर्धेची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी व नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘मॅजिक’ संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या जनजागृती सत्रात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment