विशेष लेखः- पशुधनासाठी चारा उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग
दुष्काळाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढेल असे अनुमान आहे. अर्थात या सगळ्याला एल निनो परिणाम हा घटक जबाबदार आहे. त्यामुळे शेती, पाणी, अन्न धान्य यासोबतच पशुधनासाठी चारा याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन नियोजन केले आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी
हंगामात चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने
पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या गंगापूर तालुक्यातील एकूण १ हजार
२६२ एकर जमिनीवर चारा लागवडीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक
शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी सहकारी संस्था यांच्याकडून
इच्छापत्रे मागविण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्या संयुक्त
विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत अंदाजे तीन ते चार
महिन्यांच्या कालावधीसाठी चारा पिकांची लागवड करण्यात येईल.
गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे ९०० एकर, आंतापूर
येथे ३०० एकर आणि वरखेड येथे ६२ एकर जमीन चारा लागवडीसाठी उपलब्ध आहे. अशा प्रकारे
एकूण १ हजार २६२ एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चारा उत्पादन व प्रक्रियेचा अनुभव असलेले शेतकरी, शेतकरी
उत्पादक कंपन्या (FPOs), राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत
पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे मुरघास निर्मिती प्रकल्प
राबविणारे लाभार्थी तसेच शेतकरी सहकारी संस्था इच्छापत्र सादर करू शकतात. इच्छुक
संस्थांनी किमान १०० एकर क्षेत्रावर वैरण लागवड करण्याची तयारी दर्शविणे आवश्यक
आहे. शेतकऱ्यांचा सहभाग चारा उत्पादनात अपेक्षित आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज
मागविण्यात आले होते. हे अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व
दुग्धव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात सादर
करावयाची आहेत. त्यासाठी संबंधित शेतकरी वा संस्था यांच्याशी शासन करार करणार आहे.
पात्र संस्थांची निवड आणि भाडेतत्त्वावर द्यावयाच्या
क्षेत्राचे निर्धारण जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत
करण्यात येईल. निवड झालेल्या संस्थांकडून ५०० रुपयांच्या मुद्रांकपत्रावर करारनामा
करून घेण्यात येईल. तसेच ५० हजार रुपये अनामत रक्कम धनाकर्षाद्वारे जमा करावी
लागेल.
शेती महामंडळाच्या जमिनीचे सर्वसाधारण भाडे प्रतिएकर ७ हजार
रुपये असून, ते आगाऊ भरावे लागेल. उत्पादित चारा आवश्यकतेनुसार सर्वप्रथम शासनास
उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. शासनास आवश्यकता नसल्यास जिल्हाधिकारी यांच्या
मान्यतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा विक्री करता येईल; मात्र
जिल्ह्याबाहेर चारा विक्री करता येणार नाही. जमिनीचा वापर केवळ चारा उत्पादनासाठी
करणे आवश्यक राहील.
शेती महामंडळाच्या जमिनीवर शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रोस्ताहन
देण्यात येत आहे. चारा उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग घेण्याचा हा उपक्रम नक्कीच
शेतकऱ्यांना फायद्याचा असेल शिवाय ऐन उन्हाळ्यात पशुधनाला आपल्याच जिल्ह्यात चारा
उपलब्ध होईल,असा प्रशासनाचा हेतू आहे.
माहिती संकलन
जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

Comments
Post a Comment